Haripaatha (in Marathi)हरीपाठ 

॥१॥
देवा पांडुरंगा विठ्ठला श्रीरंगा । सख्या गोविंदा मायबापा ॥१॥
आईची माया प्रेमाची छाया । दिलीस देवराया आई होवोनी ॥२॥
संभाळिले मला पिता होवूनी । गुरू होवूनी शिकविले ॥३॥
नमितो तुझ्या यासर्व रूपा । अव्यक्त अरूपा पांडुरंगा ॥४॥

॥२॥
गुण तुझे गावे भक्ता सुखवावे । प्रेमे अर्पावे काव्यसुमन ॥१॥
यासुमनाने प्रसन्न तू होई । शिरी फक्त ठेवी आमच्या हात ॥२॥
सुमन हे तुझे अर्पिले तुलाच । मध्ये उगाच मी येई ॥३॥
माफ करावी ही लेकराची खोडी । कृपेची सावली देई आम्हा ॥४॥

॥३॥
थोरपण तुझे वेदाही नाकळे । तेथे माझ्या बळे काय सांगू ॥१॥
विज्ञान आधुनिक सैरावैरा धावे । तरीही न पावे अंतिम सत्य ॥२॥
तेथे मी सांगतो तुझे थोरपण । असे उदाहरण प्रेमाचे तुझ्या ॥३॥
संगीत अनाहत ऐकतो दिनरात । डोलतो आनंदात सर्वकाळी ॥४॥

॥४॥
कसे व्हावे सुखी प्रश्न हाच मनी । दुसरी काही जनी चिंता नाही ॥१॥
सुखासाठी केवळ सतत धावणे । कुटंब पोसणे सुखासाठी ॥२॥
नसे गैर काही या वर्तनात । जोवरी मनात शांती नाही ॥३॥
मनःशांती मिळवूनी प्रपंच करावा । पुरूषार्थे भरावा जीवनपट ॥४॥

॥५॥
मनःशांतिसाठी हरी शरणागती । यापरी दुसरी गती नाही ॥१॥
पैशासी शरणागती करता अधोगती । चिंता दिनराती पाठीलागी ॥२॥
विषयांसी शरणागती करता श्वानमती । जिव्हा आणि रति केवळ सुचे ॥३॥
म्हणोनी केवळ हरीसी शरण । जावोनी सुजाण सहजची होई ॥४॥

॥६॥
हरी शरण जाता फिटे सर्व चिंता । भेटूनी अनंता सुख होय ॥१॥
भोगावे विषय जाणूनि प्रसाद । परंतु उन्माद करू नये ॥२॥
प्रयत्ने मिळवावे धन धान्य सर्व । परंतु गर्व करू नये ॥३॥
विनम्र राहोनि प्रपंच करावा । पायी ठेवावा श्रीहरीच्या ॥४॥

॥७॥
श्रीहरीची थोरी वर्णू मी काय । कोणता उपाय करू आता ॥१॥
मनीचे हे गुज हरीसी ठावे । व्यर्थची लिहावे काय म्हणूनी ॥२॥
लिहीणे हे नसे प्रभु तुजसाठी । भक्तासाठी केवळ लिहीतसे ॥३॥
हरीचे कौतुक भक्त वाचती । वाचूनी तृप्ती त्यांची होई ॥४॥

॥८॥
भक्तिची खूण भजावे सगुण । सगुणी निर्गूण ओळखावे ॥१॥
सगुणी संदेह ठेवूनी निर्गूण । पावो जाता शीण केवळ होई ॥२॥
सगुण निर्गूण फोल विभागणी । हरी उच्चारणी मोक्षसुख ॥३॥
 ब्रह्ममाया दोन नसे हे द्वैत । परमात्मा अद्वैत केवळ असे ॥४॥

॥९॥
तया भगवंताचे जग हे खेळणे । स्वप्नी प्रगटणे जैसे गाव ॥१॥
स्वप्नीचे गाव सत् की असत् । द्वैत की अद्वैत कसे ओळखावे ॥२॥
सत्य म्हणता होई ते नाहीसे । असता पण येई अनुभवासी ॥३॥
 येथेची खूण सत्य एक ज्ञान । ज्यायोगे भान अनुभवाचे ॥४॥

॥१०॥
ज्ञान हे सत्य जाणते तत्त्व । तयासी महत्त्व केवळ द्यावे ॥१॥
ज्ञान हे जाणीव सदोदीत असे । तिच्यायोगे भासे दृश्य सृष्टी ॥२॥
जाणीव होई देहामध्ये जीव । विश्वामध्ये शिव तीच असे ॥३॥
शिवतत्त्व असे हरीचे प्रगटणे । विश्वरूप होणे लीलामात्र ॥४॥

॥११॥
सच्चिदानंद आहे हरीचे नाव । तयासी भोळाभाव मान्य होई ॥१॥
मिथ्याभिमाने व्यर्थ जाईल रे सर्व । सुखाचे ते मर्म हरीभक्ति ॥२॥
ब्रह्म हे सत चित ही माया । आनंद मिळवाया हरीभक्ति ॥३॥
आनंद जाणावे हरीचे स्वरूप । ज्यामुळे चित ब्रह्म होई ॥४॥

॥१२॥
निर्गुणी बघू जाता म्हणू त्यासी ब्रह्म । माया म्हणू सगुणासी ॥१॥
विभागणी केली समजण्यासाठी । अनुभवण्यासाठी नसे योग्य ॥२॥
अनुभव तो केवळ अद्वैत हरीचा । तेथे द्वैताचा मार्ग नाही ॥३॥
ब्रह्ममाया द्वैत हरीमध्ये नाही । अद्वैतासी पाही जीवनामध्ये ॥४॥

॥१३॥
जीवनी सार्थक सहजची होई । आठविता विठाई सर्वकाळी ॥१॥
विठ्ठलाची आठवण सतत ठेविता । नाम स्मरीता मनामध्ये ॥२॥
स्मरणाने होई मनाचे उन्मन । दुःखाचे उच्चाटन समूळ जाणा ॥३॥
नाम घेता घेता आपण व्हावे शांत । स्वरूपी निवांत होवूनी रहावे ॥४॥

॥१४॥
नामाचा जप थांबवावा तोही । मौन्यमुद्रा घ्यावी आतबाहेरी ॥१॥
मौन ही स्थिती जीवाची सहज । बोलण्याची गरज जगामध्ये ॥२॥
वेळ असता आपण असावे मौन । मनाचे उन्मन त्याने होई ॥३॥
नामाने करावी मौनाची सुरूवात । मनाने शरणागत भगवंतासी ॥४॥

॥१५॥
बोलणे थांबविता धावे सैरावैरा । मन हा भोवरा सर्वकाळी ॥१॥
मनाचे धावणे साक्षीत्वे पहावे । आपण रहावे हरीशरणी ॥२॥
नामाने साधे हरीसी जवळीक । प्राप्त होई सुख आत्मस्वरूपी ॥३॥
तयाची प्राप्ती होता उद्धरती । विषय विसरती जीवमात्र ॥४॥

॥१६॥
सर्वही जीवांचा आहे हरी सखा । हरीचरणी सुखा उणीव काय ॥१॥
प्रपंची समाधान ठेवूनी रहावे । प्रयत्न पण करावे सर्वसामर्थे ॥२॥
प्रयत्ने मिळवावे सुख प्रतिष्ठा धन । पण तेवढेच जीवन मानू नये ॥३॥
जीवनी सार्थक होईल रे काया । पावता राया वैकुन्ठीच्या ॥४॥ 

॥१७॥
सर्वही जीवांची वहावी काळजी । पाऊले टाकावी सावकाश ॥१॥
पायाखाली येती किडामुंगी कोणी । त्यांची जीवहानी व्यर्थ होई ॥२॥
वागणे ठेवावे संयमी जीवनी । वावरणे आणि वाणी संयमित ॥३॥
उगाच धावपळ करणे टाळावे । धीराने रहावे सर्वकाळी ॥४॥

॥१८॥
धीर धरावा प्रयत्न करावा । विश्वास ठेवावा देवावरी ॥१॥
योग्य वेळ येता प्राप्त होते सर्व । तोवरी कर्म आपले करावे ॥२॥
प्रत्येक फळाचा वेगळाच ऋतु । फुलांचाही ऋतु वेगवेगळा ॥३॥
कर्मफळाचा ऋतु तोही वेगळा । प्रत्येकाचा निराळा प्रारब्धानुसार ॥४॥

॥१९॥
कर्माचे फळ न टळे सर्वथा । सुख वा व्यथा निश्चित होई ॥१॥
यातुनी सुटण्याचा मार्ग जाणा एक । कर्मफळत्याग हरीपाशी ॥२॥
भविष्याची चिंता मिटे त्याग होता । आनंद मागुता येत असे ॥३॥
देहाचे सुख व्यथा देहाची । व्यर्थ होय मनाची आनंदापुढे ॥४॥

॥२०॥
कर्माचे नियम जीवासी छळती । फिरविण्यासी मति भगवंताकडे ॥१॥
भगवंताची आठवण होता सोडती । जीवासी त्यागती त्याची कर्मे ॥२॥
तेथूनी होई आनंदमय जग । त्याग वा भोग हरीची इच्छा ॥३॥
हरीकृपा होता मिळे सर्व सुख । अंति मोक्षसुख विदेहमुक्ति ॥४॥

॥२१॥
आता पूर्ण जाहले लिखाण । अनुभव हा प्रमाण यापुढे ॥१॥
नेहमी करावे हरीपाठाचे वाचन । अंतरंगी परिवर्तन सहज होई ॥२॥
ज्ञानदेव निवृत्ति तुकया नामा । एकनाथ हरीनामा सांगूनी गेले ॥३॥
त्यांच्याच आशिर्वादे लिहीले यथे । रामे सौरभनाथे सुचविले ॥४॥

॥२२॥
 अंति स्तुती करू श्रीहरीची । आता उपदेशाची गरज काय ॥१॥
पांडुरंग हरी वासुदेव हरी । नारायण हरी ऐसा जप ॥२॥
रामकृष्णी ध्यान लावूनी ठेविले । प्रत्यक्ष पाहीले भगवंतासी ॥३॥
दीनांचा स्वामी अनाथांचा नाथ । पंढरीचा नाथ भेटीयेला ॥४॥